Monday, August 13, 2012

'नेचर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी', एक वेगळा छंद...


निसर्गाची साथ कोणाला आवडत नाही? श्रावणात हिरव्या गार झाडीतून चालताना जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. सकाळी उठल्यावर असंख्य पक्षांच्या मंजुळ आवाजात चहा घेण्याची मजाच वेगळी आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ मिळाला की आपण शहरातल्या गर्दी पासून लांब पळायला बघतो, आणि अश्या वेळी निसर्गाची मैत्री खूपच गोड वाटू लागते. निसर्गाशी मैत्री करण्याचे बरेच मार्ग आपण शोधत असतो. काही लोक ' ट्रेकिंग ' आणि 'हाईकींग' ची संधी उचलतात. ज्या लोकांना खूप शाररीक श्रम झेपत नाहीत ते आपल्या 'मॉर्निंग वॉक' मध्ये निसर्गाचा आनंद घेतात. अश्या अनेक मार्गांमध्ये एक खूप वेगळा मार्ग आहे जो आपल्याला निसर्गाशी खूप निखळ मैत्री करण्यास मदत करतो. तो म्हणजे 'नेचर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी'.

ऑगस्ट २००६ ला मी अमेरिकेत पुढच्या शिक्षणासाठी आलो. अमेरिकेचा भूगोल खूप बहुरंगी आहे. एक राज्य आपल्याला बर्फाची ओळख करून देतो तर दुसरा राज्य वाळवंटाची. जशी माझी अमेरिकेतली भ्रमंती वाढू लागली, तसा मी नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या जागा शोधण्याच्या मागे लागलो. अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक माणसाने कोणती निसर्ग सौंदर्य जपणाऱ्या जागा न चुकता पहाव्यात याची यादी मी बनवायला लागलो. 'येलो स्टोन नॅशनल पार्क', 'डेथ व्हेली नॅशनल पार्क', 'ग्रांड कॅन्यन नॅशनल पार्क', 'शेनंदोव्हा नॅशनल पार्क' अशा अनेक जागा माझा मनात आता घर करू लागल्या. जसा जसा मी ह्या जागांच्या विषयी पुस्तकं वाचायला लागलो, इंटरनेट वर त्यांची माहिती मिळवायला लागलो, तसा मी लोकांनी त्या ठिकाणी काढलेले फोटो चाळायला लागलो. माझा नझरेत अनेक अप्रतिम छायाचित्रांनी आपला ठसा उमटवला. मी असा विचार करायला लागलो कि मी ही असे छान फोटो काढू शकेन का? फोटोग्राफी चा छंद जोपासला तर त्या निमित्ताने नव्या जागा ही बघणं होईल आणि फोटोग्राफी पण शिकता येईल. प्राण्यांची आवड लहानपणापासून असल्याने 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफी' कडे मला विशेष आकर्षण वाटू लागले. अश्या रीतीने मी 'नेचर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी' कडे एक सुरेख छंद म्हणून बघायला सुरवात केली. २००६ साली शिकत असताना माझ्याकडे 'डिजिटल एस-एल-आर' कॅमेरा घेण्या इतके पैसे न्हव्ते. मग मी एका साध्या 'पॉइंट अँड शूट' कॅमेर्यानी सुरवात केली. 'डीगीटल एस-एल-आर' आणि 'पॉइंट अँड शूट' मधला फरक मी लवकरच तुम्हाला सांगेन. कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा फोटो काढता येईल ह्याचा विचार मी करायला लागलो. २ वर्ष बराच सराव केला आणि त्या नंतर मी माझा स्वतःचा पहिला ' डिजिटल एस-एल-आर ' कॅमेरा घेतला.


' डिजिटल फोटोग्राफी ' साठी दोन प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. 'पॉइंट अँड शूट' आणि ' डिजिटल एस-एल-आर '. 'पॉइंट अँड शूट' कॅमेरा आपण दररोजच्या फोटोग्राफी साठी वापरतो. सोनी, पानासोनिक, कॅनोन, निकोन अश्या बर्याच कंपन्यांचे कॅमेरे आपल्याला बाजारात बघायला मिळतात. 'डीगीटल एस-एल-आर' कॅमेरे मात्र 'पॉइंट अँड शूट' च्या तुलनेत महाग आणि आधुनिक असतात. 'पॉइंट अँड शूट' कॅमेरे ५० डॉलर्स पासून बाजारात उपलब्ध आहेत. पण ' डिजिटल एस-एल-आर ' ची किंमत ४०० डॉलर पासून सुरु होते आणि ती ५००० डॉलर्स पर्यंत जाऊ शकते. जगातले प्रसिद्ध छायाचित्रकार ' डिजिटल एस-एल-आर ' कॅमेऱ्यांचा वापर करतात. आपल्याला आता असा प्रश्न पडत असेल की मग हे कॅमेरे बाकीच्या कॅमेर्यानपेक्षा इतके महाग का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या कॅमेऱ्यांनी काढलेल्या छायाचित्रांकडे बघूनच कळेल. ही छायाचित्र इतकी उत्तम दर्जाची असतात कि तुम्हाला त्यांची मोठी 'पोस्टर्स' करून घेता येतात. 'पॉइंट अँड शूट' कॅमेऱ्यांनी काढलेले फोटो मोठे करायला गेलं की धुरकट दिसू लागतात. 'डीगीटल एस-एल-आर' कॅमेर्यामध्ये एका डासाच्या किव्हा माशीच्या पायावरचे केस टिपण्याइतकी क्षमता असते. अश्या बार्कायी दर्शवणार्या फोटोंना 'मॅक्रो फोटो' म्हणतात. मी काढलेल्या ''मॅक्रो फोटोग्राफी' चे हे एक उधारण. ह्या फोटोत आपल्याला सापाच्या अंगावरचे पाण्याचे थेंब ही दिसून येतात.
                  
          



'डीगीटल एस-एल-आर' कॅमेऱ्यांना त्यांची स्वतःची 'लेन्स' असते. आपण कोणत्या प्रकारचा फोटो काढतो आहोत त्याप्रमाणे ही लेन्स बदलता येते. म्हणजे 'मॅक्रो फोटोग्राफी' करता खास 'मॅक्रो लेन्स' बाजारात उपलब्ध आहेत. अश्याच प्रकारे 'वाईड अँगल लेन्स' (सूर्योदय किंवा निसर्ग
सौंदर्य टिपण्यासाठी), 'टेलीफोटो लेन्स' (लांब असलेला पक्षी किव्हा प्राण्याचे फोटो घेण्यासाठी) अश्या अनेक लेन्सेस आज बाजारात मिळतात. ह्या लेन्सेस ची किंमत १५० डॉलर्स पासून तब्बल १०००० डॉलर्स पर्यंत जाऊ शकते. हे सगळे आकडे पाहता आपल्याला अंदाज आलाच असेल की हा तसा महागडा छंद आहे. पैशाची गोष्ट थोडी बाजूला ठेवली तर ह्या छंदासाठी खूप संयम ही हवा. जर तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं असेल, तर तुम्हाला त्या एका क्षणाची वाट बघावी लागते. मला एकदा 'ऑस्प्रे' पक्षाचा माशा बरोबरचा फोटो टिपायचा होता. मी त्यासाठी सकाळी साडे सात वाजल्यापासून वाट बघत होतो. शेवटी मला दुपारी चार चा सुमारास तो फोटो टिपायला मिळाला.


       


जसा संयम हवा तसाच ह्या छंदासाठी प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची क्षमता ही हवी. उदाहरणार्थ वाळवंटातल्या एका ओसाड ओंडक्याचा छायाचित्रासाठी कसा उपयोग करता येईल, हा विचार आपण करू शकलो पाहिजे. हा फोटो मी कॅलिफोर्नियाच्या 'डेथ व्हेली नॅशनल पार्क' मध्ये घेतला आहे. छायाचित्रात ह्या एका ओंडक्यावर सगळं लक्ष केंद्रित केलं आहे. फोटो मुद्दामच संध्याकाळच्या वेळी घेतला आहे कारण मावळत्या उन्हात वाळूचा रंग आणखीन खुलून दिसतो. अशा काही गोष्टींचा खूप विचार केला की फोटोग्राफी आपल्या आपणच आवडायला लागते.


     


आणखीन एक उदाहरण म्हणजे पोर्तलंड गावातल्या ह्या समुद्र किनाऱ्याच. सूर्योदयाचे सुरेख रंग ह्या छायाचित्राला एका वेगळ्याच प्रकारची झालर चढवतात. हाच फोटो जर दुपारच्या उन्हात काढला असता तर तो आकर्षक दिसला नसता. फोटो काढताना टेकडी वरचं घर फोटोच्या डाव्या कोपऱ्यात घेतलं आहे. तेच जर फोटोच्या मधोमध असलं असतं तर फोटोतल्या रंगाचं महत्व कमी झालं असतं.
         


कॅनॉन आणि निकोन हे डिजिटल फोटोग्राफीच्या बाजारातले सर्वात मोठे खेळाडू. कॅनॉन पेक्षा निकोन चांगला किंवा निकोन पेक्षा कॅनॉन असं म्हणणं खूपच चुकीचं ठरेल. दोन्ही कॅमेरे अप्रतिम आहेत. आपलं मन कोणत्या कॅमेर्यावर येऊन बसतं ते महत्वाचं. माझाकडे सध्या कॅनॉन कंपनीचा ७ डी हा कॅमेरा आहे, त्याच बरोबर दोन लेन्सेस आहेत. एक वाईड अँगल लेन्स आहे आणि दुसरी टेलीफोटो लेन्स. वाईड अँगल लेन्स मी निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी वापरतो. टेलीफोटो लेन्सचा उपयोग मला लांबच्या पक्षाचा किव्हा प्राण्यांचा फोटो काढण्यासाठी होतो. उदाहरणार्थ ह्या घुबडाच्या जवळ जाण मला शक्य न्हवतं. माझी थोडी जरी चाहूल लागली असती तर ते उडून गेलं असतं. अशा वेळी मला माझ्या टेलीफोटो लेन्सचा उपयोग झाला.


       


निसर्ग व पक्षी पाहण्यासाठी खूप लांब जाण्याची गरज अजिबात नाही. आपल्या घराच्या आजू बाजूला असलेल्या पार्क्स मध्ये बरेच "बर्ड फीडर्स" असतात. ह्या फीडर्स जवळ थोडा वेळ घालवला तरी आपल्याला भरपूर प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. रेड कार्डीनल, रॉबिन, वूडपेकर असे अनेक पक्षी ह्या फीडर्स जवळ दिवसातले बरेच तास घालवतात. आपल्या घरामागे छोटं अंगण असेल तर तुम्ही तिथेही "बर्ड फीडर्स" लाऊ शकता. घरात लहान मुलं असतील तर त्यांची अमेरिकेत आढळणाऱ्या बऱ्याच पक्षांची ओळख होईल. खालील फोटो मी माझ्या घराजवळच्या "ऑरेगॉन रिज पार्क" मध्ये घेतला आहे. हा पक्षी अमेरिकेत "रेड बेलिड वूडपेकर" म्हणून ओळखला जातो.


                


फोटोग्राफी बद्दल लिहाल तेवढ कमीच. खरतर फोटोग्राफी फक्त इथेच थांबत नाही. लोकांना 'पोर्टरेट', 'ट्रॅव्हल', 'एरीयल' अश्या अनेक प्रकारच्या फोटोग्राफीत रुची असते. तर तुम्ही पण चालता चालता दिसणार्‍या एकाध्या सुंदर फुलाचा, समुद्रामागे लपणार्‍या त्या सूर्याचा किव्हा फांदीवर बसलेल्या एका देखण्या पक्षाचा फोटो काढून बघा. निसर्गाशी आपण मैत्रीचा हात कधी मिळवला हे तुमच तुम्हालाच कळणार नाही!