अमेरिकेला बऱ्याच काळापासून संधींची भूमी म्हणून पाहिले जाते. जागतिक दर्जाचे शिक्षण व वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात वर्चस्वासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण. भारतात अनेक पालक आपल्या मुलांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन स्वतःसाठी यशस्वी जीवन घडवावे अशी स्वप्न पाहतात. मग मुले कठोर परिश्रम करतात. प्रवेश परीक्षा, अर्ज, अभ्यास ह्यात स्वतः ला झोकून देतात. आई वडील भारतीय बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतात ज्याचा बहुतेकदा व्याजदर १२% पर्यंत पोहोचतो. आणि मग एके दिवशी ही मुले दोन सुटकेस आणि आशेने भरलेली स्वप्न घेऊन विमानात चढतात.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून जीवन हे एक सतत कठीण संघर्ष आहे. रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कॅम्पसमध्ये नोकऱ्या शोधणे, अभ्यास करत करत ती नोकरी करणे, शैक्षणिक क्षेत्रात अव्वल राहणे, आर्थिक व्यवस्थापन करणे आणि घरी आपल्या आई वडिलांनी ज्ये कष्ट केलेत त्याच चीझ करून देण्याचं स्वप्न रोज पाहणे. डिग्री मिळवल्या नंतरही आराम नाहीच. मग दुसरी शर्यत सुरु होते. स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणे आणि दररोज स्वतःची योग्यता सिद्ध करणे.
एकदा नोकरी मिळाली की मग त्या मोठ्या शैक्षणिक कर्जाची परतफेड सुरु होते. ते करत असतो तो आणखी एक अध्याय सुरू होतो. आयुष्य समांतरपणे पुढे सरकायला लागते. लग्न, मुले आणि जबाबदाऱ्या वाढत जातात. वर्षे उलटतात. बघता बघता ग्रीन कार्डसाठी अर्ज होतो. तोपर्यंत, जवळजवळ एक दशक उलटून गेलेले असते. ह्या सगळ्यात कुठेतरी अमेरिका दुसरे घर वाटू लागते. ह्या काळात स्वतःचे घर विकत घेतले जाते. बायको ही नोकरी करायला लागते. मुले अमेरिकेत शाळेला जायला लागतात. ह्या सगळ्यात साता समुद्र पलीकडे भारतात पालकांना कुठेतरी अभिमान वाटत असतो. त्यांना त्यांची मुलं यशस्वी होताना दिसतात. जे स्वप्न त्यांनी एकेकाळी पाहिले होते ते आता उंचावले आहे ह्ये बघून आनंद होतो.
पण प्रत्येकजण ते तसे पाहत नाही.... लोकांची टीका होते. कुजबुज होते.. "ह्यांनी आपल्या आई वडिलांना मागे सोडलंय आणि ह्यांचं आपलं परदेशात मस्त चाललंय."
पण अनेकदा कथेची दुसरी बाजू ही असते की त्या मुलाने बांधलेले सर्व काही... करिअर, घर, स्थिरता, हे त्याच्या पालकांच्या स्वप्नांमुळेच अस्तित्वात आलेले असते कारण त्याच्या पालकांनी एकदा त्याच्यासाठी ही मोठी स्वप्ने पाहिलेली असतात. आणि ती स्वप्ने मुलांनी पूर्ण ही केलेली असतात. मग, यशस्वी झाल्याबद्दल मुलांनी अपराधीपणाची भावना का बाळगावी? आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, यातील बऱ्याच टिप्पण्या चिंतेपेक्षा मत्सरातून येतात. ज्या पालकांची स्वतःची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत त्यांना तुम्ही कधी असे आरोप करताना पाहिले आहे का? क्वचितच.
एक उदाहरण घ्या. एका भारतीय लष्करी सैनिकाचे सीमेवरच्या जंगलात खोलवर किंवा डोंगरांमध्ये उंचावर पोस्टिंग झाले आहे. तो त्याच्या पालकांच्या जवळ आहे का? नाही. त्याने जे करिअर निवडले त्यासाठी त्या अंतराची आवश्यकता आहे. अमेरिकेत राहणारी मुलं ही तेच करता आहेत, फक्त वेगळ्या गणवेशात.
वास्तव हे आहे की परदेशात राहत असले तरी कुटुंबे एकमेकांशी जोडलेली राहतात. मुले दर काही वर्षांनी त्यांच्या पालकांना भेटायला येतात. पालक अमेरिकेत येतात, त्यांच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत वेळ घालवतात. रोज फोन आणि विडिओ कॉल होतो.
आता संयुक्त कुटुंबांचे दिवस गेले. आपल्यापैकी बहुतेक जण आता वेग वेगळे राहतात. आपल्या पालकांनी शहरात करिअर घडवण्यासाठी गावे सोडली. आणि ह्या मुलांनी करिअर घडवण्यासाठी देश सोडला. हा विश्वासघात नाही, ह्ये जागतिकीकरण आहे. जे लोक आरामात बसून टीका करतात त्यांना कधीच पूर्णपणे समजणार नाही की २१-२२ वर्षांच्या मुलाने परदेशात येऊन स्वतःला पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी काय काय करावे लागते; आर्थिक, भावनिक आणि बऱ्याच काही बाबतीत. त्या मार्गावर न चालता टीका करणे खूप सोप्पे आहे.
आणि विडंबन म्हणजे, आपण सर्वांनी एकाच छताखाली राहणारी बरीच कुटुंबे पाहिली आहेत, परंतु प्रेम आणि काळजी ह्यांचा मैलोन मैल संबंध नाहीये. ह्ये लक्षात घ्यायला पाहिजे कि जवळीक किलोमीटरमध्ये मोजली जात नाही. लांब राहून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना प्रेम आणि आदर देणं, आणि त्यांना ताठ मानेनी आपल्या मुलांचं कौतुक सांगता येणं ही पण एका प्रकारची जवळीकच आहे कि.
त्यामुळे भारतात लोकांनी आपण कधीही न केलेल्या प्रवासाचे मूल्यांकन करणे कुठेतरी थांबवले पाहिजे आणि महासागर ओलांडून शून्यातून सर्व उभारण्यासाठी ज्ये धाडस लागतं त्याचं समर्थन करायला पाहिजे.
अमेरिकेत राहणार असाच एक आपला मित्र,
पृथ्वीराज भोसले
